Bollywood NewsEntertainment

भूमी पेडणेकरने पर्यावरण संवर्धनाचे मिशन पूर्ण करण्यासाठी लाँच केले ‘द भूमी फाउंडेशन’

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्लायमेट वॉरियर भूमी पेडणेकर वैविध्यपूर्ण भूमिका व अभिनयासाठी प्रसिद्ध असून सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमांसाठी तिला वाटणारी तळमळही सर्वांना माहीत आहे. त्याच संदर्भात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी भूमीने लक्षणीय पाऊल उचलले आहे. तिने ना- नफा तत्वावर काम करणाऱ्या आपल्या ‘द भूमी फाउंडेशन’चे संकेतस्थळ लाँच केले आहे. हा प्लॅटफॉर्म राष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर काम करतो.

भूमीला पृथ्वीबद्दल मनापासून जिव्हाळा वाटतो आणि म्हणूनच ती सोशल मीडियावरही क्लायमेट वॉरियर नावाची चळवळ चालवते. या चळवळीद्वारे लोकांना पर्यावरण संवर्धनाविषयी शिक्षित करण्याचे तिचे ध्येय आहे. द भूमी फाउंडेशन लाँच करत भूमीने पृथ्वीप्रती वाटणारी कळकळ ठोस कृतीतून व्यक्त केली आहे.

हा प्लॅटफॉर्म वैयक्तिक आणि एनजीओतर्फे चालवले जाणारे हवामान बदलांशी संबंधित प्रकल्प, हवामानाशी संबंधित पॉडकास्ट आणि डॉक्युमेंट्रीज, हवामानाविषयी जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम यांना निधी मिळवून देण्यासाठी काम करेल. त्याशिवाय पर्यावरणाविषयी जागरूक असणाऱ्या स्टार्टअप्समध्येही हा प्लॅटफॉर्म गुंतवणूक करेल. संस्था आणि कार्यकर्त्यांना सक्षम करून खरा बदल घडवून आणण्याचे आणि लोकसंख्या व कार्बन उत्सर्जनाचा परिणाम कमी करण्याचे ध्येय या प्लॅटफॉर्मने ठेवले आहे.

या नव्या कामाविषयी उत्सुकता व्यक्त करत भूमी पेडणेकर म्हणाली, ‘द भूमी फाउंडेशन लाँच करताना मला आनंद होत आहे. पृथ्वीची कशाप्रकारे जपणूक करता येईल याचा ठोस विचार करण्यास मी या वर्षी माझ्या वाढदिवशी सुरुवात केली आणि आज द भूमी फाउंडेशन लाँच करताना मला आनंद होत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून भारतात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण केली जाईल अशी आशा वाटते. त्याप्रमाणे योग्य व्यक्ती आणि समाजाला सक्षम करून बदल घडवून आणण्याचे माझे ध्येय आहे.’

भूमी पुढे म्हणाली, ‘तीव्र कृतज्ञता आणि पृथ्वीविषयी वाटणारे प्रेम यातून सुरू करण्यात आलेल्या द भूमी फाउंडेशनचे एकत्रित प्रयत्न, स्त्रोतांच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत आपला देश व पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्यांना सक्षम करणार आहोत.पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे आणि अधिक शाश्वत जगाची निर्मिती करण्याचे समान ध्येय असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि पर्यावरणाचे पुरस्कर्ते यांची मोठी फौज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उभारण्याचे माझे उद्दिष्ट आहे. या प्रवासाची सुरुवात करत असताना पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान मी करते.’

पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दल भूमीला वाटणारा ध्यास आता जागतिक पातळीवरही प्रसिद्ध झाला आहे. ती युएनडीपी इंडियाच्या शाश्वत विकास ध्येयांची पहिली राष्ट्रीय पुरस्कर्ती आणि पर्वतरांगा स्वच्छ ठेवून तिथली जैविक यंत्रणा जपणाऱ्या हिलिंग हिमालयाजची ती गुडविल अ‍ॅम्बेसिडर आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये