क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
शादलुई व गौरवच्या खेळाने पुणेरी पलटणचा तमिळ थलायवाज संघावर रोमांचकारी विजय

मुंबई, 7 जानेवारी 2024: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत अखेरच्या क्षणी झालेल्या संघर्षपूर्ण कामगिरीच्या जोरावर तमिळ थलायवाजचा 29-26 असा रोमांचकारी पराभव करताना पुणेरी पलटण संघाने सलग सातव्या विजयाची नोंद केली.
एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत मोहम्मद रेजा (5पकडी व चढाईत 3गुण) आणि गौरव खत्री(6पकडी) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. तमिळ थलायवाजकडून कर्णधार सागरने 7पकडी करताना दिलेली झुंज एकाकी ठरली.

सामन्यातील पहिली 20मिनिटे अत्यंत चुरशीची होती. नरेंदरने सुपर रेड करताना थलायवाजला आघाडी मिळवून दिली. मात्र पुणेरी पलटण संघाने सावध खेळ करताना उत्कृष्ठ बचाव केल्यामुळे मध्यतरला त्यांच्याकडे 12-11 अशी आघाडी राहिली. मध्यंतरा पर्यंतचा हा या मोसमातील सर्वात कमी गुण फलक होता.
उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच शादलुईने सुपर रेड करताना पुणेरी पलटण संघाला आघडीवर नेले. त्याचवेळी नरेंदर च्या अपयशी ठरत असताना तमिळ थलायवाजकडून सागर व पंकज मोहिते यांनी केलेल्या पकडीमुळे तमिळ संघाने आपले आव्हान कायम राखले.
शादलुईने नरेंदरची पकड करून 28व्या मिनिटाला पाचवा गुण मिळवला खरा, परंतु अभिषेक आणि सागर यांनी केलेल्या सुपर टॅकल मुळे 38व्या मिनिटाला तमिळ थलायवाजची पिछाडी केवळ एका गुणावर आली.
आता अखेरच्या चढाईवर सामन्याचा निकाल अवलंबून होता. तमिळ संघाचे तीन खेळाडू मैदानात होते आणि पुणेरी पलटणची ही डू फॉर डाय चढाई होती. अस्लमने नितेशला बाद केल्याचा दावा केला परंतु मैदनवरील पंचांनी तो अमान्य केल्यामुळे गुण फलक 28-28 असा झाला. मात्र पुणेरी पलटण संघाने यावर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली व त्यांनी अस्लमच्या बाजूने निर्णय दिल्याने पुणेरी पलटण संघाला अखेरच्या क्षणी विजय नोंदवता आला.