ताज्या घडामोडीराजकीय

सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत विशेष परिसंवादाचे आयोजन ‘कलासेतू’

मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि शासन यांच्यात समन्वयाचा पूल बांधण्याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक कार्यविभाग आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात (दादासाहेब फाळके चित्रनगरी ) यांच्या वतीने गुरुवारी ‘कलासेतू’ या विशेष अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत तीन वेगवेगळे विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे उपस्थित होते.

पहिल्या परिसंवादाला ज्येष्ठ तंत्रज्ञ उज्वल निरगुडकर, वितरक समीर दिक्षित, लेखक- दिग्दर्शक अभिजीत पानसे, कामगार नेते विजय हरगुडे आदि मान्यवरांनी सहभाग घेतला. या मान्यवरांना मिडिया वनचे गणेश गारगोटे यांनी बोलतं केलं. या परिसवांदाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी काय करता येईल याचा परामर्श घेण्यात आला. ‘मराठी चित्रपटसृष्टीसमोरील नवी आव्हाने’ या पहिल्या परिसंवादात ‘ १५०० हुन अधिक चित्रपट तयार होतात त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे तसेच अमेरिका फिल्म मार्केटची माहिती निर्मात्यांना देणे, सबटायटल बाबत कार्यशाळा आयोजित करणे आदि वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

‘शासकीय धोरण आणि वेबपोर्टल’ या दुसऱ्या परिसंवादात ज्येष्ठ निर्माता -दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, आशुतोष पाटील, योगेश कुलकर्णी आदि मान्यवर सहभागी झाले होते. मराठीला चित्रनगरीत ५० % सवलत देणे, SGST बंद करणे, करपती योजना चालू करणे , अनुदान बंद करणे, निर्माता होण्याकरिता नियमावली तयार करणे, आंतरराष्टीय चित्रपटासाठी पॅनल निर्माण करणे, निर्मात्यांसाठी व्यासपीठ निर्माण करणे ,सिंगल स्क्रीनचे कर माफ करणे आदि मुद्द्यांचा उहापोह करण्यात आला.

तिसऱ्या परिसंवादात ‘चित्रपट निर्मिती, वितरण, विपणन’ याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे, दीपक देऊळकर,अभिनेत्री किशोरी शहाणे, चैतन्य चिंचलीकर, विकास खारगे या मान्यवरांनी सहभाग घेतला. नवीन निर्मात्यांना मार्गदर्शन करणे,मल्टिप्लेक्स दर कमी करणे, मराठीसाठी २०० हुन अधिक चित्रपटगृह बांधणे, एसटी स्टॅडजवळ मल्टीप्लेक्स उभारणे, वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे आदी अनेक उपायांचा अंतर्भाव यात करण्यात आला.

 

भविष्यातील बदलाची पावले ओळखून आणि येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाचा विचार करून मराठी चित्रपटसृष्टीने सर्वांगाने वेगळा विचार करण्याचा सूर ‘कलासेतू’ च्या परिसंवादात उमटले. आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी चित्रपटांचा सहभाग, मराठी चित्रपट महामंडळाचे योगदान, चित्रपटसृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा देणे, इतर भाषिक लोकांचे रजिस्ट्रेशन, ओटीटी प्लॅटफॉर्म तयार करणे, फिल्मसिटीमध्ये AUGMC त्यात करणे, चित्रपटगृह, नाट्यगृह उभारणे आदी सुविधा प्रामुख्याने होणे गरजेचं असल्याचं मत सर्वांनीच मांडलं.

या सगळ्या सूचनांचा विचार करून शासन आवश्यक त्या सर्व गोष्टींचा निश्चितच पाठपुरावा करेल असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. शासनातर्फे अनेक नव्या योजना, प्रस्ताव लागू करण्याचा मानसही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलून दाखविला. कलासेतू च्या माध्यमातून संवादाचा निर्माण झालेला हा पूल मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा ‘राजमार्ग’ ठरेल असा विश्वास सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार तंत्रज्ञ आणि वाहिन्याचे प्रमुख उपस्थित होते.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये