स्वामी समर्थ देणार श्री राम रूपात दर्शन…
२१ जानेवारीच्या विशेष भागात आपल्या सर्वांना पाहायला मिळणार एक अनोखी लीला

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेत नेहमीच स्वामींच्या अनेक लीला पाहायला मिळतात. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे म्हणत स्वामी नेहमी आपल्या भक्तांना धीर देतात आणि प्रत्येक संकटातून वाचवतात. मालिकेत आतापर्यंत आपल्याला स्वामींचे अनेक रुपात दर्शन घडले आहे. २१ जानेवारीच्या विशेष भागात आपल्या सर्वांना पाहायला मिळणार एक अनोखी लीला. ज्यात स्वामी भक्ताला राम रूपात दर्शन देणार.
रत्नाकर ने अवघं आयुष्य खर्ची घालून तीन फूटी राममूर्ती आकाराला घातली आहे. त्याच्या शेतातील एका झाडाखाली त्याला या मूर्तीची स्थापना करायची आहे. हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि आता ते ध्येय पूर्ण होणार म्हणून तो अत्यानंदित आहे. रत्नाकरची पत्नी
कौमुदी स्वामी भक्त आहे. तिची इच्छा आहे की प्रतिष्ठापनेच्या आधी रत्नाकर ने स्वामींना मूर्ती दाखवावी. पण रामाव्यतिरीक्त इतर कुणालाही न मानणारा रत्नाकर ते साफ नाकारतो.
इकडे रत्नाकरने मूर्ती स्थापनेचा एक शुभ मुहूर्त काढला आहे. पण त्याच दरम्यान एका सरदाराची नजर त्या राममूर्तीवर पडते आणि तो जबरदस्तीने मूर्तीचं हरण करतो. आपलं आयुष्यभराचं स्वप्न भंगलं या विचाराने रत्नाकर पूर्ण खचतो. कौमुदी आता स्वामींना शरण जाते. इथून पुढे गोष्टीत वेगळं वळण येतं. ते काय असेल हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा, एक तासाचा विशेष भाग, ‘जय जय स्वामी समर्थ’, महारविवार, २१ जानेवारी, दु.२.०० व रात्री ८.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.