‘गुलाबी’मध्ये घडणार मैत्रीची सफर…
‘गुलाबी’ चित्रपटातील ‘सफर’ हे प्रेरणादायी गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रृती मराठे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे संगीतप्रेमींच्या प्रचंड पसंतीस येत आहे. अदिती द्रविड हिने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला साई – पियुष यांचे संगीत लाभले आहे. तर आयुष्याची सफर घडवणारे हे गाणे राहुल देशपांडे यांनी गायले आहे.
‘मी टाईम’ हरवलेल्या मैत्रिणी या गाण्यातून स्वत्वाचा शोध घेताना दिसत आहेत. आयुष्यातील त्यांची ही सफर त्यांना हरवलेले अस्तित्व शोधण्यात मदत करताना दिसत असून मैत्रीच्या नात्याचा एक सुंदर प्रवास यातून उलगडत आहे. गाण्याच्या सादरीकरणासह जयपूरची रंगीबेरंगी सफरही घडत आहे.
गाण्याबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ‘’ कधी कधी आयुष्यातील एखादी सफर खूप काही मौल्यवान ठेवा देऊन जाते. या गाण्यातील ही सफर अशीच आहे. तीन वेगळ्या विचारांच्या, व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती एकत्र येऊन त्यांचे आयुष्य सुंदररित्या जगत आहेत. हे एक प्रेरणादायी गाणे असून मैत्रीची एक सुंदर सुरुवात यात दिसत आहे. हे गाणे ऐकून अनेक मैत्रिणी अशी सफर करण्यास निश्चितच तयार होतील.’’
व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपटाच्या सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे निर्माते आहेत. तर अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रृती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.