EntertainmentSerial

अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे ‘अस्तित्व’

भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत

नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून यात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या. नकारात्मक भूमिकाही त्यांनी केल्या. मात्र आता बऱ्याच काळानंतर भरत जाधव या नाटकाच्या माध्यमातून एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

ही कथा एका अशा कुटुंबाची कहाणी आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. कुटुंबातील एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही कथा आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे.
या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. साई पियुष यांचे या नाटकाला संगीत लाभले असून सरीता भरत जाधव या नाटकाच्या निर्माती आहेत.

नाटकाबद्दल दिग्दर्शक स्वप्नील जाधव म्हणतात, ” सर्वसामान्यांना भावणारी आणि हृदयाला स्पर्श करणारी ही कथा आहे. आपण नेहमीच सगळ्यांकडून कळत नकळत अपेक्षा ठेवत असतो. या अपेक्षांसोबत मेळ साधताना कुठेतरी आपण आपले अस्तित्व हरवून बसतो. अशा वेळी हे नाटक प्रत्येकाला नक्कीच सकारात्मक मार्ग दाखवणारे ठरेल. या अपेक्षांच्या गर्तेत गुरफटलेल्या अस्तित्वाचा शोध घेणारे हे नाटक, नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडेल. आपल्याच घरात किंवा आपल्या आजूबाजूला घडणारी ही कथा आहे, त्यामुळे प्रेक्षक या नाटकाशी समरूप होतील. एवढं नक्की की हे भावनिक नाटक कुटुंबाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यास मदत करेल.”

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये