धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेला “भिशी मित्र मंडळ”

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्तासोबत चित्रपटाचे निर्माते, प्रस्तुतकर्ते, लेखक, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीम आवर्जून उपस्थित होती.
अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच पुणे येथे सुरु होणार असून संजीवकुमर चंद्रकांत हिल्ली ये सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत.
भिशी म्हणजे, ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून ते एक सदस्याला दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या “भिशी मित्र मंडळ” चित्रपटात प्राजक्तासोबत कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार आहे यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे.