ताज्या घडामोडी

टीव्ही ९ मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप २०२३’ सोहळा दिमाखात संपन्न…

रसिकांचं मनोरंजन करण्याची परंपरा जपत मराठी सिने-मालिका विश्वाने नेहमीच लक्षवेधी कामगिरी केली आहे. पूर्वापार चालत आलेल्या पुरस्कार सोहळ्यांनी कलाकार-तंत्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं आहे. याच परंपरेत महाराष्ट्रातील नंबर १ वाहिनी असलेल्या टीव्ही ९ मराठीने सिंहाचा वाटा उचलत ‘आपला बायोस्कोप’ पुरस्कार सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवत नवं पाऊल टाकलं आहे. दणक्यात झालेला ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात चित्रपट आणि मालिकांमध्ये रंगतदार लढत झाली. ३० नोव्हेंबर रोजी सहारा स्टार हॅाटेलमध्ये नृत्य-गायनाने रंगलेल्या या सोहळ्यासाठी मनोरंजन विश्वातील तारकादळ अवतरले. या सोहळ्यात ‘सुभेदार’, ‘वेड’, ‘वाळवी’ आणि ‘गोदावरी’ या चित्रपटांसोबत घरोघरी पोहोचलेल्या मनोरंजक मालिकांनी बाजी मारली.

टाळ्या-शिट्ट्यांच्या निनादात ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आवर्जून उपस्थित होते. त्यांनी टीव्ही ९ मराठीच्या ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कार सोहळ्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. याखेरीज सिनेमा तसेच मालिका विश्वातील आघाडीच्या कलाकार-तंत्रज्ञांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. चित्रपट विभागामध्ये ‘सुभेदार’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. ‘वेड’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत दिग्दर्शनाकडे वळलेल्या रितेश देशमुखने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘वाळवी’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या शिवानी सुर्वेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं. ‘सुभेदार’साठी चिन्मय मांडलेकरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि ‘बाईपण भारी देवा’मधील भूमिकेसाठी सुकन्या मोने यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सयाजी शिंदे यांनी ‘घर बंदूक बिर्याणी’मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेने त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळवून दिला. ‘वेड’मधील रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्काराची मानकरी बनली. याच चित्रपटातील ‘वेड तुझं…’ हे सर्वोत्कृष्ट गाणं ठरलं. दिग्पाल लांजेकर यांनी ‘सुभेदार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आपल्या नावे केला.

टीव्ही मालिका विभागातही चुरशीची लढत झाली. सर्वोत्कृष्ट मराठी मालिकेचा पुरस्कार पटकावणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या गळ्यात विजयाची माळ पडली. ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामींची व्यक्तिरेखा साकारणारा अक्षय मुडावदकर सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘ठरलं तर मग’मधील जुई गडकरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अनुक्रमे ‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील प्रशांत चौडप्पा आणि ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ज्योती चांदेकर यांना प्रदान करण्यात आला. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत सुनिल तावडेंनी साकारलेली भूमिका सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या पुरस्कारासाठी, तर कविता मेढेकरांची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील अभिनय सर्वोत्कृष्ट खलनायिकाच्या पुरस्कारासाठी योग्य ठरली. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ऋषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे यांना सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या दिग्दर्शनासाठी सचिन गोखले यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आपल्या नावे केला. सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या तूफान लोकप्रिय कार्यक्रमाला सर्वोकृष्ट कथाबाह्य मालिकेचा पुरस्कार देण्यात आला.

रितेश देशमुख, सिद्धार्थ जाधव, वर्षा उसगांवकर, निवेदिता सराफ, संदीप कुलकर्णी, शंतनू मोघे, सुशांत शेलार, अभिजीत खांडकेकर, संतोष जुवेकर, संदिप पाठक, सुयश टिळक, समीर चौघुले, स्मिता तांबे, नागेश भोसले, पल्लवी वैद्य, माधवी निमकर, अपूर्वा नेमळेकर, शर्मिष्ठा राऊत, विजय पाटकर, विजय कदम, जयवंत वाडकर, कांचन अधिकारी, राजेश देशपांडे, शिवाली परब या आणि अशा असंख्य तारकांनी या दिमाखदार सोहळ्यास आवर्जून उपस्थिती लावत कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रसाद ओक आणि श्रेया बुगडे यांनी केलेल्या धम्माल सूत्रसंचालनामुळे पुरस्कार सोहळ्याला चारचाँद लागले.

पुरस्कार विजेत्यांची नावे : चित्रपट विभाग: 

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – सुभेदार

सर्वोत्कृष्ट अभिनेता – रितेश देशमुख (वेड)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – शिवानी सुर्वे (वाळवी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – चिन्मय मांडलेकर (सुभेदार)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सुकन्या मोने (बाईपण भारी देवा)

सर्वोत्कृष्ट खलनायक – सयाजी शिंदे (घर बंदूक बिर्याणी)

सर्वोत्कृष्ट जोडी – रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (वेड)

सर्वोत्कृष्ट गाणं – वेड तुझं (वेड)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर (सुभेदार)

टीव्ही मालिका विभाग :

सर्वोत्कृष्ट मराठी मालिका – ठरलं तर मग (स्टार प्रवाह)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – अक्षय मुडावदकर (जय जय स्वामी समर्थ)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जुई गडकरी (ठरलं तर मग)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – प्रशांत चौडप्पा (फुलला सुगंध मातीचा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – ज्योती चांदेकर (ठरलं तर मग)

सर्वोत्कृष्ट खलनायक – सुनिल तावडे (पिंकीचा विजय असो)

सर्वोत्कृष्ट खलनायिका – कविता मेढेकर (तुला शिकवीन चांगलाच धडा)

सर्वोत्कृष्ट जोडी – ऋषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे (तुला शिकवीन चांगलाच धडा)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सचिन गोखले (ठरलं तर मग)

सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन – महाराष्ट्राची हास्यजत्रा (सोनी मराठी)

परिक्षक पसंती पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट – जितेंद्र जोशी (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट – सायली संजीव (गोष्ट एका पैठणीची

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चित्रपट – निखिल महाजन (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चित्रपट – निखिल महाजन (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – आत्मपॅम्फ्लेट

९ डिसेंबर रोजी रात्री ९.०० वाजता ‘आपला बायोस्कोप २०२३’ हा पुरस्कार सोहळा टीव्ही ९ मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये