Serial

रसिकांची अत्यंत ऋणी – ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे

रंगभूमी, मालिका, चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडत अभिनेत्री नयना आपटे यांनी स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या रंगभूमीय कारकीर्दीला ७० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांच्या ‘प्रतिबिंब’ या आगामी आत्म चरित्राचे डिजिटल मुखपृष्ठ आणि शांता आपटे यांच्या ‘जाऊ मी सिनेमात’? आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक अशोक समेळ यांच्या हस्ते करण्यात आले .

सवाईगंधर्व’आणि ‘संस्कृती सेवा न्यास’ यांच्या विद्यमाने मुलुंड येथील कालिदास नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास आनंद म्हसवेकर, मकरंद कुंडले, मुकुंद मराठे ,मंगला खाडिलकर, नयना आपटे यांचे पती विश्वेश जोशी आदी अनेक मान्यवर उपस्थितीत होते .

अनेक हृदय आठवणींना उजाळा देत नयना आपटे यांच्या अभ्यासू वृत्तीचे आणि मेहनतीचे कौतुक अनेक मान्यवरांनी याप्रसंगी केले. रंगभूमी जगणार्‍या कलावंत अशा शब्दांत गौरव करत नयना आपटे यांच्या कडून आजच्या युवापिढीने प्रेरणा घ्यायला हवी असे मतही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

रसिकांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्ताने माझा जो सन्मान या संस्थेने केला त्यासाठी मी त्यांची आणि तुम्हा सर्व रसिकांची अत्यंत ऋणी आहे अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक अशोक समेळ यांना यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव आणि ऑर्गन वादक मकरंद कुंडले यांना कै. अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल या दोन मान्यवरांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

गायक ज्ञानेश पेंढारकर, निलाक्षी पेंढारकर,अपर्णा अपराजित, मुकुंद मराठे, ऑर्गन वादक मकरंद कुंडले, तबला वादक आदित्य पानवळकर यांनी आपटे यांच्या संगीताचा उत्तम कार्यक्रम सादर केला. वरदा नृत्यालयाची संचालिका नृत्यांगना गायत्री दीक्षित व सहकारी यांनी कथक प्रकारातून नयना आपटे यांना मानवंदना दिली. तर आकाश भडसावळे, प्रवीणकुमार भारदे, अथर्व गोखले, स्वराली गर्गे यांनी नाट्य सादरीकरण केले. नयना आपटे यांनी टिळक- आगरकर या त्यांच्या नाटकाचा नाट्य प्रवेश यावेळी सादर केला तसेच सोहळ्याची सांगता ही त्यांच्या गाण्याने झाली.

संपूर्ण सोहळ्याचे अतिशय सुंदर निवेदन अमेय रानडे आणि तपस्या नेवे यांनी केले. नयना आपटे यांची अत्यंत दिलाखुलास मुलाखत मंगला खाडिलकर यांनी घेतली, ती रंगली. या संपूर्ण कार्यक्रमाची मोट कलाकार आणि निर्माता आकाश भडसावळे याने बांधली. कार्यक्रम व्यवस्थापन राकेश तळगावकर यांनी लीलया पेलले.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये