Entertainmentताज्या घडामोडी

रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ”नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित…

११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'नाद'

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या आजवरच्या प्रवासात नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा, तसेच महाराष्ट्रातल्या घरोघरी आपली ‘देवमाणूस’ ही ओळख निर्माण करणारा किरण गायकवाड एका नव्या रूपात समोर येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटात किरणचं कडक रूप पाहायला मिळणार आहे. ‘नाद’ हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत देत या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. मोशन पोस्टरवरील किरणची भेदक नजर ‘नाद’ करायचा नाय असंच जणू सांगत असल्याचं जाणवतं.

शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांची निर्मिती असलेल्या ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपटाचे निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर आहेत. रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार यांनी निर्मिती व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली आहे. प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ या शीर्षकाला साजेशा फर्स्ट लुकनंतर प्रकाश पवार आणि त्यांच्या टिमने तितकंच दमदार मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. हे पोस्टर खऱ्या अर्थानं रसिकांची उत्सुकता वाढवणारं आहे. ‘मिथुन’, ‘रांजण’, ‘बलोच’ असे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट देणारे प्रकाश पवार ‘नाद’मध्ये काहीतरी भन्नाट दाखवणार असल्याची जणू चाहूलच मोशन पोस्टर देतं. राखाडी रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला किरण गायकवाड मोशन पोस्टरवर लक्ष वेधून घेतो. किरणचा चेहरा दाखवण्यापूर्वी त्याच्या उजव्या हातातील रक्तरंजित कोयता पाहायला मिळतो. किरणच्या चेहऱ्यावर तसेच अंगावर जखमा असून, त्याच्या डोळ्यांत अन्यायाविरोधातील आग आहे. किरणने आपल्या डाव्या हाताने घाबरलेल्या अवस्थेतील नायिकेला कवटाळलं आहे. त्यानंतर पोस्टरवर चित्रपटाचं ‘नाद – द हार्ड लव्ह’ हे टायटल येतं. ‘नाद’चं मोशन पोस्टर लक्ष वेधून घेणारं असून, चित्रपटात काय पाहायला मिळणार याबाबतची उत्सुकता वाढवणारं असल्याचं दिग्दर्शक प्रकाश पवार यांचं म्हणणं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना किरणचा एक नवा अवतार पाहायला मिळणार असून, या व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी त्याने खूप मेहनत केली आहे. त्याला अभिनेत्री सपना मानेची अचूक साथ लाभली आहे. सपनाचा जरी हा पहिलाच चित्रपट असला तरी तिने एखाद्या मातब्बर अभिनेत्रीसारखे काम केले आहे. केवळ नायकाला साथ देणं इतकीच तिची भूमिका नसून, तिने दिलेला लढाही महत्त्वाचा आहे. एका नव्या जोडीची अफलातून केमिस्ट्री रसिकांना नक्कीच खिळवून ठेवेल असा विश्वासही प्रकाश पवार यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या लाल मातीतील खऱ्याखुऱ्या प्रेमाचे अनोखे कंगोरे उलगडण्याचं काम ‘नाद’ चित्रपट करणार असून, एका हार्ड प्रेमाची कथा सांगणार आहे. या चित्रपटाची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. वैभव देशमुख यांच्या साथीने विनायक पवार यांनी गीतलेखनही केलं आहे. या चित्रपटात किरण आणि सपनाच्या जोडीला यशराज डिंबळेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी, तर सतीश चिपकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत लाभलं असून, कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली आहे. कलाकारांना यथायोग्य वेशभूषा करण्याचं काम निगार शेख यांनी केलं असून, रमेश शेट्टी यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिलं आहे. सुजित मुकटे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. तुषार घोडेकर आणि संकेत चव्हाण यांनी लाइन प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये