रघुवीर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद… लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आयोजित केला विशेष शो…
मन:शक्तीची ताकद पटवून देत आध्यात्मासोबत व्यायामालाही महत्त्व देणारे थोर संत समर्थ रामदास स्वामी यांच्या चरित्रावर आधारलेल्या ‘रघुवीर’ चित्रपटाचा सर्वत्र उदो उदो होत आहे. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांसोबतच सिनेसृष्टीतील मान्यवर, तसेच दिग्गजांकडूनही ‘रघुवीर’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रभरातील सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे ‘रघुवीर’चे शो हाऊसफुल होत आहेत. ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणारे तसेच महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘रघुवीर’च्या विशेष शोचे आयोजन केले आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील कोथरूड येथील सिटीप्राईड सिनेमागृहात ‘रघुवीर’चा विशेष शो आयोजित केला आहे. या शो दरम्यान ‘रघुवीर‘ची संपूर्ण टीम व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दर्जेदार ऐतिहासिक मराठी चित्रपट जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचावा यासाठी दिग्पाल लांजेकर यांनी घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.
या चित्रपटात विक्रम गायकवाड यांनी साकारलेल्या समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेचं विविध स्तरांतून कौतुक होत आहे. सिनेमागृहांतून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची भावना पाहायला मिळते. समर्थ रामदास स्वामींच्या शिष्यगण परिवारातील असंख्य भक्त चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या चित्रपटातील स्त्री सक्षमीकरणाचा मुद्दा, व्यायामाचा मुद्दा, तरुणांनी केवळ राऊळात टाळ कुटून उपयोगाचे नाही, तर परचक्र आल्यास हातात तलवारीही धरण्याची शक्ती मनगटांमध्ये असायला हवी हे समर्थांचे विचार रसिकांच्या मनाला भिडत आहेत. रविंद्र साठ्ये यांच्या आवाजातील गाणे संगीतप्रेमींच्या ओठांवर रुंजी घालत आहे. यातील हिमालयातील लोकेशन्स आणि सिनेमॅटोग्राफी रसिकांना मोहिनी घालत आहेत. ‘रघुवीर’मध्ये रामदास स्वामींची एन्ट्री होताच ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष केला जात आहे. काही प्रेक्षक चित्रपटगृहांमध्येच रामदास स्वामींना साष्टांग दंडवत घालत आहेत. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया ‘रघुवीर’बाबत रसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण करत आहेत.
डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगानं समर्थ क्रिएशन्स यांनी ‘रघुवीर’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते अभिनव विकास पाठक, तर सहनिर्माते वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॉ. किरण छगन बडगुजर आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन निलेश अरुण कुंजीर यांनी केलं आहे. जयेश हरेश्वर जोशी आणि श्री रामदास स्वामी संस्थान तसेच श्री समर्थ मंडळ सज्जनगड सातारा यांचा खूप मोलाचा वाटा या सिनेमाला मिळाला आहे. दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी अभिराम भडकमकर यांच्या साथीने पटकथा लिहिली असून, भडकमकर यांनी संवादलेखन केलं आहे. ऋजुता देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखार्गे, गणेश माने यांच्याही यात भूमिका आहेत. सचिन सुहास भावे कार्यकारी निर्माते आहेत. गीतकार मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अजित परब यांनी स्वरसाज चढवला आहे. सिनेमॅटोग्राफी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी, तर संकलन जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी केलं आहे.