आदि शंकराचार्यकृत गणेश पंचरत्न!
लोकप्रिय पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट! मुंबईतील श्री सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण!
अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, अनुराधा पौडवाल यांच्या कन्या कविता पौडवाल, या ध्वनिचित्रफितीचे निर्माते लंडनस्थित व्यावसायिक दिलीप आपटे यावेळी उपस्थित होते. अत्यंत मांगल्यपूर्ण वातावरणात या पारंपारिक, सुश्राव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण भक्ती रचनेच्या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण सिध्दीविनायकाच्या साक्षीने झाले.
गणेश पंचरत्न हे श्री गणेशाची स्तुती करणारे एक उत्तम श्लोक काव्य आहे. काही महिन्यांपूर्वी सुप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी आदि शंकराचार्य रचीत विघ्नहर्त्याचे हे पंचरत्न स्तुती काव्य लंडन येथील हाऊस ऑफ कॉमनमध्ये गायले. ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून ते सर्वसामान्य भाविकांना आता ऐकता येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात संगीत रसिक आणि श्री गणेश भक्तांना अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात पंचरत्न श्लोक काव्य ऐकण्याचा भाग्य योग लाभणार आहे.
मंगळवारी श्री सिध्दीविनायक मंदिराच्या प्रांगणात ‘गणेश पंचरत्न’ श्लोककाव्य प्रसारित करण्यात आले. त्यामुळे तेथील प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात भर पडली. मंदिरात दर्शनासाठी येणारे हजारो भाविक तल्लीनतेने हे श्लोककाव्य ऐकत होते.