नार्वेकर ‘बॅक इन ॲक्शन’ …
मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलीवूडमध्ये ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर आता ‘रानटी’ चित्रपटातून आपल्याला अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. ‘सदा राणे’ नावाच्या खतरनाक खलनायकाची भूमिका ते साकारत आहेत. ‘सदा राणे’ ही अत्यंत क्रूर व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा थरकाप उडवणारी आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना संजय नार्वेकर सांगतात, ‘सदा राणे’ हा वरकरणी अतिशय शांत पण आतून कपटी असा खलनायक साकारणे माझ्यासाठी चॅलेंजिंग होते. चित्रपटाच्या कथानकाला वळण देणारी ही भूमिका प्रेक्षकांनाही धडकी भरवणारी आहे. ‘कथेच्या गरजेनुसार भूमिकेत शिरणे माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक असते. अशा भूमिका फार कमी लिहिल्या जातात, दिग्दर्शक समित कक्कड यांच्या ‘रानटी’ चित्रपटामुळे मला ‘सदा राणे’ या खलनायकाच्या व्यक्तिरेखेत प्रवेश करण्याची जबरदस्त संधी मिळाली आणि मी माझ्या पद्धतीने ती पडद्यावर साकारली आहे. समितच्या चित्रपटात काम करणे हा नेहमीच एक भन्नाट अनुभव असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची कथा जबरदस्त असल्याने त्यात भूमिका करणे हे प्रत्येकासाठी चॅलेंजिंग असतं. प्रेक्षकांनाही हा ‘सदा राणे’ दीर्घकाळ लक्षात राहील याची मला खात्री वाटते.
‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम लाभलेली आहे.