कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेत आस्ताद काळे नवीन भूमिकेत !
मुंबई / विजय कांबळे
सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याची झलक प्रेक्षकांना आवडली आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. सोबतच रूपल नंद हीसुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.
आता या मालिकेत प्रवेश होणार आहे एका नवीन व्यक्तिरेखेचा. आस्ताद काळे हा अभिनेता नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत आस्ताद एका नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुहास साटम असे या नेत्याचे नाव असून आता मालिकेत त्याच्या येण्याने कथानक काय वेगळे वळण घेणार? भोसले आणि जमदाडे यांच्या कामात काय भर पडणार का ? हे पाहण्याजोगे असणार आहे.
‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेत कलाकारांची चांगली फळी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. त्यात आता आस्ताद काळेच्या येण्याने मालिकेत एक वेगळी रंगत पाहायला मिळेल. एका पेक्षा एक वरचढ कलाकार एकाच वेळेला जेव्हा एकाच मालिकेत दिसतील, तेव्हा ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या थरारक मालिकेत जे वेगळेपण येईल ते पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर असेल.
लेखक चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांचादेखील सोनी मराठी वाहिनीसाठी, मालिकेसाठी चांगलाच हातभार लागला आहे. तर पाहायला विसरू नका, नवी मालिका, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.