जिथे जनतेला खुपते तिथे हजर गुप्ते !…
बहूचर्चित कार्यक्रम म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते..

प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने आणि प्रेमामुळे झी मराठीचा मंच प्रेक्षकांच्या आनंदासाठी सतत काही ना काही नवीन, दर्जेदार सादर करतच असतो. पुन्हा एकदा झी मराठी बऱ्याच काळानंतर म्हणजेच जवळपास १० वर्षानंतर एक जबरदस्त व अफलातून कार्यक्रम आपल्या भेटीस आणत आहे आणि तो बहूचर्चित कार्यक्रम म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. परत एकदा तो येणार आणि सगळ्यांची गुपित उलगडणार आहे.
प्रेक्षकांनी ह्या कार्यक्रमाच्या प्रोमो व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. राजकीय व्यक्ती, कलाकार आणि ह्या सारखे अनेक जण ह्या खतरनाक खुर्चीवर विराजमान होणार आहेत. गुप्तें कडे असलेल्या प्रश्नांमुळे खुर्चीवर बसणाऱ्यांचे धाबे नक्कीच दणाणणार आहेत. ह्या बहुचर्चित कार्यक्रमाची सुरवातच त्यांनी जनतेच्या दरबारात केली आणि जनतेच्या मनात खुपणाऱ्या गोष्टी जाणून घेतल्या. गुप्तेच्या ह्या खतरनाक खुर्चीने मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क आणि काळाचौकी येथे आपला जलवा दाखवला. अनेक सामान्य जणांनी त्या खुर्चीवर बसून गुप्तेंच्या प्रश्नांना उत्तरे देत असतांना मनातील खदखद व्यक्त केली. हा कार्यक्रम होत असतांना मनसेचे पदधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावून ‘खुपते तिथे खुपते’ ह्या येऊ घातलेल्या झी मराठी वरील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
अजून एक भन्नाट गोष्ट म्हणजे पहिल्याच भागात जबरदस्त भारदस्त व्यक्तीचे ह्या मंचावर आगमन होणार आहे. ज्यांचा राजकारणात आहे खूप बोलबाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे महाराष्ट्राचे आवडते नेते आणि मनसेचे सर्वेसर्वा माननीय श्री. राज ठाकरे साहेब. गुप्तेंच्या खोचक नी धारदार प्रश्नांना राज साहेब देतील तेवढीच धारदार उत्तरे. ‘खुपते तिथे गुप्ते’, ४ जून पासून दर रविवारी रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.